Thursday, 27 February 2014

रोजनिशीतले एक पान..

 खूप दिवसांनी आज पहाटे  उठले. बाकी कोणत्याही गोष्टीपेक्षा लवकर उठले कि आनंद होतो. कायम लवकर उठावं, पण त्यात सुसंगता येणं जरा अवघडच आमच्यासाठी.
सूर्योदय पाहिला. चिमण्या कावळे चिव चिव, काव काव करत होते. बाहेर एक चक्कर मारून आले. पहाटेची थंडी असते, तशी थंडी होती.  कुडकुडताना मजा आली. एक मुलगा स्वेटर घालून शाळेला निघाला होता . हातात जेवणाचा डबा , इस्त्री केलेले कपडे, अगदी छान विंचरलेले केस, पावडर वगैरे. एकदम शाळेची आठवण झाली.  सकाळी सातला  सायकलवरून शाळेत हजर. त्या मुलाचा थोडा हेवा वाटला एकदम .
घरी आले , चहा केला. आई बरोबर बसून प्यायला . तिनं केलेलं  उप्पीट खात असताना बाहेर एक भिक्षुक बाहेर येऊन सुंदर गाणं म्हणू लागला . बाहेर जाऊन बसले त्याचं गाणं ऐकत. एका हातात छोटी पेटी, कपाळावर गंधाचा टिळा. अगदी नेटनेटका अवतार आणि सुरेल अवाज. नुसते  पैसे मागण्याऱ्या लोकांपेक्षा ह्याला पाहून खूप प्रसन्न वाटलं . त्याच्याशी गप्पा मारायच्या होत्या पण राहूदे म्हणलं. परत कधीतरी.
मग एक्वेरियम मधले मासे पाहत बसले. आई परत झोपली  होती . थकली असेल, रात्री उगाच काळजी करत बसली होती . आता उठवावासं नाही वाटलं . झोपलेल्या माणसांकड पाहताना शांत वाटतं. तेवढाच वेळ बहुतेक आपण मुखवटे काढून बाजूला ठेवतो .
बसल्या बसल्या तेंडुलकरांची एक कथा वाचून काढली. त्यांनी त्यांच्या विशीत लिहिलेली. साखरपुड्याच्या दिवशी मुलगा एकदम लग्नाच्या भीतीने नकार कळवतो* आणि मुलगी नंतर त्याला जाब विचारायला येते अशी सरळ गोष्ट होती, पण शेवटी ती तेंडुलकरांची कथा. पुढच्या कथा वाचण्या अगोदर ह्या कथेबद्दल थोडा विचार करावासा वाटलं म्हणून पुस्तक बाजूला ठेवून बसले. डायरी काढून थोडा लिहून काढलं. कथेबद्दलंच न लिहिता अजून पण खूप काही लिहिलं. हे असलं मुक्तलेखन आवडत जास्त. काही विचार  न करता मनात येईल ते भरभर लिहणं.
जर मन भारावलं मग.  त्या शाळकरी मुलाचा विचार मनात परत आला, मग त्या चिमण्यांचा.
दुरून डोंगर साजरे म्हणतात , तसाच प्रकार हा. त्या चिमण्यांना असतीलच कि त्यांची दुखं, पण ह्या क्षणाला तरी तो डोंगर नक्कीच साजरा  आहे असं वाटतं  आहे.
आपण स्वप्नं भरपूर बघतो आणि स्वतःकडून काही अपेक्षा करू लागतो . खऱ्या जगात आलो की त्या अपेक्षा आणि सत्य परिस्थितीमध्ये तफावत बघून निराश होताना खूप जणांना पाहिलं आहे मी . हाच खरा संघर्ष असतो. इथंच आपण आपला मार्ग निवडतो. 'ह्या देशाचं असंच चालायचं' हे म्हणायचं, ' हा ढोंगी देश आपल्यासाठी नाही, आपण बुवा निघालो इथून' का  'हो, बिघडलंय खूप काही म्हणूनचं ते रुळावर आणायचं' हा  विचार करायचा हे माझ्या हातात आहे.  असे बरेचसे प्रश्न आहेत म्हणा.
चिमण्यांना काय, किंवा त्या शाळेतल्या मुलाला ह्या प्रश्नांना उत्तर शोधावं नाही  लागणार आहे. मला पण अगदी दिवस रात्र ह्याबद्दल विचार करायची गरज नाहीये खरं तर. हाती मोकळा वेळ भरपूर आहे म्हणून उगाच हे सगळं. पाण्यात पडले कि सगळे शिकतात पोहायला, त्याच्याबद्दल अगोदर खूप विचार केला तर मात्र उगाच शंका वाटते.
 विचार करता करता इंटरनेट उघडून काही बाही वाचत बसले. बाकीचा दिवस कशातच लक्ष नाही लागलं. राहून राहून थोड  भरून येत होतं.
अजून एक काहीसा निरर्थक, काहीसा विवेकी दिवस. दिशा किंवा समाधान मात्र नाही.




* Cold feet ला मराठी शब्द आहे तरी का?