Monday, 9 June 2014

चौकटीच्या बाहेर





कुठल्या तरी क्षुल्लक कारणासाठी मी रडत बसले होते. माझा एक मित्र खूप वेळ मला समजावण्याचा प्रयत्न करत होत. खूप वेळ मी रडत असल्याने शेवटी वैतागून म्हणाला, 'Come on, be a man, don't cry!'. बाई आणि पुरुषांच्या पारंपारिक भूमिका झुगारून देण्यात ह्या मित्राचा कायमच पुढाकार असतो. तो असं काहीतरी म्हणाला आणि मी एकदम चमकून त्याच्याकडे पाहू लागले. त्याला पण त्याची चूक लक्षात आली. ओशाळून माझ्याकडे पाहू लागला आणि आम्ही एकदम जोरात हसू लागलो. आपल्या रक्तात स्त्रीत्व-पुरुषत्वाच्या कल्पना किती मुरलेल्या असतात ना ? खूप प्रयत्न केला तरी कधीतरी तोल जातोच. 

दुःख न दाखवणारा, खंबीर, रक्षणकर्ता तो म्हणजे पुरुष आणि नाजूक, काहीशी दुसऱ्यांवर अवलंबून असणारी, पुरुषाच्या मुख्य भूमिकेला साथ देणारी म्हणजे स्त्री . समाजात वावरताना थोड्या फार फरकाने असे समज कायम डोकावतात. थोडं नाजूक वागणारा तो पुरुष बायल्या आणि स्त्रीच्या पारंपारिक कल्पनेत न बसणाऱ्या स्त्रीला हिजडा, आडदांड अशा शब्दांनी हिणवलं जातं.

 मी एका नृत्याच्या कार्यक्रमाला गेले होते. एका तरुणाचा डान्स सुरु झाला. माझ्याजवळ बसलेल्या काकुंचं लक्ष स्टेजवरच्या छान नाचाकडे  नव्हतं.'किती बायक्या मुलगा आहे' 'अति नाजूक मुद्रा' 'नृत्य करणारी मुलं समलिंगी होतात' 'माझ्या मुलाला मी नाचाच्या क्लासला नाही पाठवणार बाई' असा काहीसं बोलण्यात त्यांनी भरपूर वेळ घालवला. माझं कार्यक्रमातून लक्ष  उडालं आणि पूर्वदुषित ग्रहांमुळे एखाद्या सुंदर कलाकृतीला माणूस कसा मुकतो याबद्दल मी विचार करू लागले.
         'आहे मनोहर तरी' हे सुनिताबाईंच पुस्तक मी अधूनमधून  नेहेमी वाचते. परवा ते परत वाचताना त्यांचं  जी.ए. कुलकर्णी यांच्याबद्दलचं एक वाक्य खूप लक्षात राहिलं. 'I live on prejudices', गैरसमजांचा छंद जोपासणारे म्हणून त्यांनी जी.एंचा उल्लेख केला आहे. त्या माणसाचे इतर सद्गुण आपल्यात नसले तरी हा एक दुर्गुण मात्र आपल्या सर्वांमध्ये नक्की असतो. एकाद्या माणसा बद्धल काही कळलं तर ते  पडताळणी न करता आपण आपले मत ठरवतो. खाजगी आयुष्यात तर हे होतंच पण आपल्या प्रसारमाध्यमातून सुद्धा हे ठळकपणे दिसून येतं. 
 लिंगभेद सोडा, जात, भाषा, गाव यांबद्दलच्या पुर्वाग्रहामध्ये आपण इतके फसून जातो कि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची निर्मळ दृष्टी आपण गमावून बसतो. त्यामुळे समाजाने आखून दिलेली चौकट झुगारून बाहेर पडू पाहणाऱ्या व्यक्तीची खूप कुचंबणा होते.कुटुंबाची खंबीर साथ लागते आणि ती मिळाली तर समाजातले इतर घटक हात धुवून मागे लागतात. 
मुलांच्या बाबतीत म्हणायच तर, मुल खूप चुकतात आणि त्याची त्यांना थोडीफार जाणीव देखिल असते. आईवडील मात्र आपलं काही चुकत का हा विचार करतच नाहीत. या सगळ्यामध्ये आपण एकमेकांपासून दुरावतो आणि त्याला generation gap असं गोंडस नाव देतो. एकमेकांच्या पिढ्यांना नावं ठेवतो पण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न क्वचितच केला जातो.

 माझा मुख्य  मुद्दातर राहूनच गेला. जसा हा दोन पिढ्यांचा वाद आहे, तसाच लिंगभेदाचा पण आहे. भेदभावामुळे स्त्रियांना त्रास होतो, खूप होतो. पण पुरुषांना होणारा त्रास आपण जमेस धरत नाही. मर्दपणा वगैरे वगैरे शब्द वापरतोच की आपण.
एक किस्सा सांगते तुम्हाला. एका मुलगा अपघातात जखमी झाला.  त्याच्या बाबांना ती बातमी सहन झाली नाही आणि ते एका लहान मुलासारखे ढसढसा रडू लागले. काकूंनी पुढाकार घेवून सगळं केलं आणि काकांना सावरलं. 'पुरुषाला असं शोभत का?', 'काय गं बाई ध्यान!' असे शेरे मी त्यानंतर महिनाभर गावात ऐकत होते. पुरुषमंडळी तर बोलत होतीच पण बायकाही तोंडावर पदर धरून फिदी फिदी हसत होत्या. 
आपल्या देशात होणाऱ्या बलात्कारांमध्ये २ टक्के बलात्कार पुरुषांवर होतात. कधी वाचली आहे अशी बातमी पेपरमध्ये? याबद्दल मूक का राहतो आपण? आकडा मोठा नाही आहे म्हणून? जोपर्यंत लिंगभेद हा फक्त स्त्रियांपर्यंतच मर्यादित नाही याची आपण दखल घेत नाही, तोपर्यंत काही तोडगा निघणं अवघड आहे. महिलांसाठी कायदे , आरक्षण करून समस्या सुटतील का आपल्या? नाही, समस्या सुटण्याऐवजी स्त्रीपुरुषांमधली दरी आणखीनच वाढेल असं वाटतं. 
स्त्रियांना बरोबरीची वागणूक मिळत नाही, म्हणून सतत रागात असणाऱ्या  काही व्यक्तींना भेटले आहे मी. त्यांचा राग रास्त असला तरी विचार करण्याची ती पद्धत खूप एकांगी असते. पुरुषांनी आपल्यावर अन्याय केला म्हणून संधी मिळाली तर आपण पण तेच करणार का? tit for tat? जशास तसे? किती सूडबुद्धी लपलेली आहे त्यात. स्त्री श्रेष्ठ कि पुरुष याबद्दल खूप वाद्विवाद होतात. शाळेमध्ये असताना पण आम्ही मुली, तुम्ही मुल हे कायम व्हायचं. मुळात आपण जेन्डरला एवढं महत्व देतोच का ?
एकतर्फी विचार करून सुटण्यासारखा हा गुंता नाही. लिंगभेद ही आपल्या समाजातली एक मोठी समस्या आहे हे स्वीकारण गरजेचं आहे. पुरुषांनी आणि स्त्रियांनीही. लहानपणापासून लिंगभेद मनात रुजतो म्हणून तो तिथूनच थांबवावा लागेल. समाजात प्रत्येक स्तरावर याबद्दल संवाद होण्याची गरज आहे.

आणि रोजच्या जीवनात? जावयाला जसा मान देता तसा कधीतरी सुनेलाही देऊन बघा. आणि, सुनेला जसं हक्कानं काम सांगता तसा जावयालाही सांगून पहा. एखादी बाई जर घर सोडून बाहेर जात असेल तर तिची हेटाळणी करू नका. त्याच बरोबर जर एखाद्या स्त्रीने घरी राहण्याचा निर्णय घेतल्या तर तिनं केलेल्या त्यागाची दखल घ्या. आमच्या शिंदे काकुंसारखं, मुलगा हॉटेल management करतोय म्हणजे स्वयंपाकी होणार असा विचार करून रडत तर आजिबात बसू नका! 
शेवटी काय आहे मंडळी, बदलायचा कि नाही ते आपल्या हातात आहे. बदल करण्याची वेळ तर आली आहे. 
'Be the change you want to see in the world' असं गांधीजी म्हणायचे.  
समाजात बदल घडवून आणायचा असेल तर सुरवात स्वतःपासून करा असा या वाक्याचा अर्थ. काय म्हणताय, करायची सुरवात एकत्र ?
मला नक्की कळवा.